Trending

लेखः परीक्षा न घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्यच, माझे लोकसत्ताच्या अग्रलेखाला उत्तर

coronavirus-banner

आज देशात कोविद-१९  पॉझीटीव्ह ची   संख्या २,१७,९६७ ( १,०७,४९१ अक्टिव्ह, ६३०१ मृत्यू  ) झाली आहे आणि महाराष्ट्रात हा आकडा ७४,८६० (३९,९४४ अक्टिव्ह, २७१० मृत्यू ) पर्यंत पोहोचला आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे जिल्हा स्वास्थ प्रशासनावर येणारा ताण. मध्ये मध्ये तर काही जिल्हा प्रशासनाने आपले हात वर केले आणि सांगितले कि तुमचे तुम्ही  बघा… हि आहे आजची परिस्थिती आणि दुसरीकडे आपल्या देशातील परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा उतावीळ झाल्यात परीक्षा घ्यायला.

तसेही आपल्या देशात परीक्षा म्हणजे एखादे राष्ट्रीय कर्तव्यच, जणू जर ते झाले नाही तर काहीतरी विपरीत घडणार.  आज बहुतेकांना एकच चिंता लागली आहे , मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे , जसे काही या आधी सर्वच एकदम सुरळीत होते. आज ची गरज आहे ती पँडेमिक मुळे झालेली परिस्थिती नियंत्रणात आणायची. एकीकडे सरकार फिजीकल डिस्टंसिन्ग बद्दल बोलत आहे आणि दुसरीकडे परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा त्याच्या विपरीत करत आहेत. सी बी एस इ आणि आय सी एस इ सारख्या संस्था  तर परीक्षा घेण्याकरिता फारच उतावीळ झालेल्या  आहेत.

मला वाटते राज्य सरकारने घेतलेल्या “राज्यातील विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षा रद्द या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, आणि शिक्षणमंत्र्यांचा तो अधिकार असायलाच हवा, जनतेने त्यांना निवडून दिलेले आहेच मुळी यासाठी. विद्यार्थांनी मागणी केली आणि ती सरकारने मान्य केली त्यात वाईट काय आहे ? “आदित्य ठाकरे , रोहित पवार अशांच्या मागणीवरून इतका मोठा निर्णय घेतला जाणार असेल तर हा शिक्षणाचा “पोर”खेळ झाला” (लोकसत्ता एडिटोरिअल ४ मे २०२०) . याचा अर्थ काय ? कुणी तो निर्णय घेतला असता तर तो “पोर”खेळ झाला नसता? विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनावर जर विचार करून जन प्रतिनिधी असा निर्णय घेत असतील तर तो लोकशाहीला धरूनच आहे. या २०२० मध्ये यापेक्षा मोठे “पोर” खेळ आम्ही अनुभवले आहेत. एखाद्या राज्यात भर पहाटे जेव्हा जनता साखर झोपेत असते तेव्हा राज्यपाल मुख्यमंत्र्यांना  शपथ देतात, यापेक्षा मोठा “पोर” खेळ काय असणार…….

मला वाटते परीक्षा हि विध्यार्थाने काय ग्रहण केले, तो विद्यार्थी किती शिकला , यासाठी असते आणि परीक्षेच्या निकालावरून एक प्रकारे आपण तो पुढील वर्गात जाण्यासाठी योग्य आहे कि नाही किंवा तो नोकरी करण्याच्या लायकीचा आहे कि नाही  हे बघण्याचा प्रयत्न करतो. आज आपण बघितले तर दर वर्षी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परीक्षा घेण्यात येते, पण बहुतांश मुले काय शिकलीत  हे सांगणे अवघड आहे. आज परीक्षांचा प्रकार असा झाला आहे “सकाळी खायचे आणि संध्याकाळी ओकारी करायची”.  देशातील नामांकित कंपन्या सुद्धा तुम्ही कुठली परीक्षा पास होऊन आलात त्याला महत्व देत नाहीत , प्रत्येक जण आपापल्या परीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासतातच. मग हा सगळा परीक्षेचा अट्टाहास का? आणि तो हि पँडेमिक सारख्या विपरीत परिस्थितीत. जर परीक्षा झाल्या तर वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी एका ठिकाणी येतील, आणि आपल्या सोबत कोविद १९ घेऊन जातील. आज आपण बघतच आहोत कि   फिजीकल डिस्टेनसिंग किती पालन होत आहे. एखादे वर्षी मागील वर्षांची सरासरी लक्षात घेऊन निकाल दिला तर फार मोठा पहाड तुटणार नाही. एखादा विद्यार्थी परीक्षा द्यावीच लागेल या निर्णयामुळे जर कोविद पॉझीटीव्ह झाला, आणि त्याचे जर काही  बरे वाईट झाले तर कोण जबाबदारी घेणार, एडिटोरिअल लिहिणारा याचे उत्तर देणार का ? स्थिती गंभीर आहे, विद्यार्थ्यावरच जबरदस्ती का? ज्या दिवशी नेते मंडळी विधान भवनात, संसदेत बसायची हिम्मत करतील त्या दिवशी खुशाल परीक्षा घ्या. पण तोपर्यंत विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका, याचे राजकारण करू नका.

शिक्षणाचे उद्धिष्ट फक्त परीक्षा घेण्यापुरतेच मर्यादित झालेले दिसते, परीक्षा घेणे आणि निकाल देणे म्हणजेच शिक्षण असे समीकरण झालेले आहे. शिक्षणाचे उद्धिष्ट भारताच्या संविधानाची दृष्टी समोर ठेऊन निर्धारित केली आहेत. ज्यामध्ये असे नमूद केले आहे कि शिक्षण अशी व्यवस्था निर्माण करण्यास मदत करेल जी व्यक्तीला विचार व कामाची स्वतंत्रता आणि तार्किक दृष्ट्या निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवेल , याचसोबत दुसऱ्यांच्या भावनांची कदर करायला शिकवेल, नवीन परिस्थितीत लवचिक व रचनात्मक पद्धतीचे उत्तरदायित्व, वचनबद्धता व लोकशाही प्रक्रियेच्या सहभागातून देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी व सामाजिक बदलांसाठी योगदान देण्याची संभावना निर्माण करन्यास प्रेरित करेल. म्हणून परीक्षा म्हणजे शिक्षण आणि शिक्षण म्हणजे परीक्षा अशी गफलत करायला नको असे मला आवर्जून वाटते.

विद्यार्थी परीक्षांना घाबरत नाहीत कारण त्यांनी खूप परीक्षा दिल्या आहेत आजवर, त्यामुळे  त्यांच्या अध्ययन क्षमतांबद्दलच शंका घेणे चुकीचे ठरते. करोनाकाळाचे निमित्त नाही, हि समस्या गंभीर आहे, विद्यार्थ्यांचे बरे वाईट झाले तर, ते सामान्य परिस्थितीतुन येतात , त्यांना सरकारी यंत्रने वर च इलाजासाठी अवलंबून राहावे लागते. ज्यांच्याकडे पॉवर आहे ते तर त्यांच्या  जिल्हा रुग्णालयात न जाता दुसरीकडे जिथे चांगल्या सोयी उपलब्द आहेत तिथे जातात, अशा घटना साक्षी आहेत, आणि त्याही आताच घडलेल्या. म्हणून मला तर वाटते परीक्षा रद्द करणे, ही कृती अशैक्षणिक नसून वेळीच घेतलेला योग्य निर्णय आहे.

आज सर्व जग कोविद १९ शी लढत आहे, आपण हि लढत आहो याची कल्पना  तंत्रशिक्षण परिषद, औषधनिर्माण शास्त्र परिषद, बार कौन्सिल यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थांना असणारच.  अशावेळी परीक्षा न घेता आजवरच्या परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीवर विध्यार्थ्यांना योग्य संधी द्यावी आणि परीक्षा झाल्यावरच ऍडमिशन चा विचार केला जाईल हा बालहट्ट त्यांनीही सोडावा कारण स्थिती काय आहे आणि किती गंभीर आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे ..

 

उच्चशिक्षणमंत्री हवेत कशाला?

गुरुवार,  ४ जुने २०२०

https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-decision-to-cancel-the-exam-by-minister-of-education-abn-97-2178214/

राज्य सरकारनेच नेमलेली तज्ज्ञसमिती, विद्यापीठे, विद्यापीठ अनुदान आयोग आणि कुलपती हे सारे अंतिम वर्षांच्या पदवी परीक्षा घेण्यास तयार असताना त्या रद्द का?

केवळ ‘विद्यार्थ्यांची मागणी’ या नावाखाली आदित्य ठाकरे वा रोहित पवार यांच्या मागणीसाठी असा अशैक्षणिक निर्णय घेण्याचा, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल आणि  राज्यातील विद्यार्थ्यांचे अहित करण्याचा अधिकार उच्च शिक्षणमंत्र्यांना कोणी दिला?

आपण उच्च शिक्षणमंत्री म्हणून किती अपात्र आहोत हे लवकरात लवकर कसे सिद्ध करता येईल या काळजीने  उदय सामंत उतावीळ झालेले दिसतात. त्यांचा ताजा निर्णय तसे दर्शवतो. तो आहे राज्यातील विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा. सामंत यांच्याकडून यापेक्षा अधिक बुद्धिमान निर्णयांची अपेक्षा करावी असे अद्याप तरी काही घडलेले नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या उच्च शिक्षणमंत्र्याच्या अशिक्षित निर्णयात इतके कसे वाहून गेले, असा प्रश्न पडतो. अखेर, सरकारचा हा निर्णय अयोग्य आहे, याची जाणीव करून देण्याची वेळ कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर आली. राज्यपालांकडून रास्त मुद्दय़ावर कान उपटून घेण्याची वेळ सरकारवर आणण्याचे श्रेय या सामंत यांचे. तेव्हा सर्वप्रथम राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेल्या योग्य भूमिकेबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या बाबत ही संधी प्रथमच मिळाली असावी. त्यासाठी ते उच्च शिक्षणमंत्री सामंत यांचे आभार मानू शकतात.

परंतु विद्यापीठांतील वा संलग्न महाविद्यालयांतील अध्यापकांच्या वेतनाचा भार राज्य सरकार उचलते, म्हणून शैक्षणिक निर्णय घेण्याचाही अधिकार आपल्यालाच, असा समज आपल्या उच्च शिक्षणमंत्र्यांचा झाल्याचे दिसते. हे म्हणजे एखाद्याचा वैद्यकीय शिक्षणाचा खर्च करणाऱ्याने औषध कशास म्हणावे याचे अधिकार आपल्यालाच आहेत असे मानण्यासारखे. आजपर्यंत विद्यापीठीय कारभारात कोणत्याही शिक्षणमंत्र्याने अशा प्रकारे ढवळाढवळ केलेली नाही. विद्यापीठांबाबतचे सर्व शैक्षणिक निर्णय केंद्रीय पातळीवरील विद्यापीठ अनुदान आयोग या स्वायत्त संस्थेमार्फत घेतले जातात. त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आणि त्यांचे कुलपती म्हणून राज्यपालांचीही. तरीही उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ परीक्षांबाबत कुलपतींना डावलून थेट विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवले आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्याहीवेळी कुलपतींनी खरे तर त्यास आक्षेप घेतला होता. त्याकडे दुर्लक्ष करीत ‘मी घाबरणार नाही, तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढणार’ अशी भूमिका उच्च शिक्षणमंत्री समाजमाध्यमांतून घेत राहिले.

त्यानंतर अलीकडेच राज्यातील सर्व कुलगुरूंनी दूरचित्र संवाद करून विद्यापीठ परीक्षांबाबत चर्चा केली. त्यावेळी परीक्षा घेणे आवश्यक असल्याचेच सर्वाचे मत झाले. दरम्यान राज्य सरकारनेही परीक्षांबाबत स्वतंत्र समिती नेमली. या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसीप्रमाणे अंतिम वर्षांच्या परीक्षा वगळता बाकी वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची शिफारस सरकारला केली. तसा निर्णय उच्चशिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्यावर विद्यापीठांनी आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याबाबतचा कृती आराखडाही तयार केला. एवढे सगळे घडून गेल्यानंतर अचानक उच्चशिक्षणमंत्र्यांनी आपलाच निर्णय मागे सारत शेवटच्या वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सूतोवाच केले. हे धक्कादायक आहे. त्यामागचे कारण काय? तर विद्यार्थ्यांची मागणी. उद्या कॉपी करणे हा आमचा अधिकार आहे, ती आम्हाला करू द्या अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केल्यास आणि सामंत (सध्या) ज्या पक्षात आहेत त्या पक्षप्रमुखांच्या चिरंजिवांच्या ‘युवा सेना’ या संघटनेने तिला पाठिंबा दिल्यास हे उच्चशिक्षणमंत्री ती मागणीही मान्य करतील. परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचे मूल्यमापन करणारे साधन असते. नेमून दिलेला अभ्यासक्रम पुरा केल्यानंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन कौशल्याची कसोटी घेणे, हा परीक्षा घेण्यामागील मुख्य हेतू. त्यामुळे जे विद्यार्थी परीक्षाच नकोत, अशी मागणी करतात, त्यांच्या अशा अध्ययन क्षमतांबद्दलच शंका घेणे क्रमप्राप्त ठरते. कोणताही विद्यार्थी परीक्षाच नको, असे म्हणतो याचे कारण त्याला परीक्षेतील यशाची पुरेशी खात्री नाही. करोनाकाळाचे निमित्त पुढे करून परीक्षा रद्द करणे, ही कृती अशैक्षणिक असून त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, याचे भान सरकारला नाही.

परीक्षा न घेता, आजवरच्या परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीवर त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर करताना, ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवून आपली प्रगती साधण्याची इच्छा आहे, त्यांना वर्षअखेरीस परीक्षा देऊन गुणवत्तेत सुधारणा करण्याची संधीही सरकारने देऊ केली आहे. हे तर अधिकच अशैक्षणिक म्हटले पाहिजे. शेवटच्या वर्षांच्या गुणांच्या आधारे नंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यामुळे अन्याय होईल. तंत्रशिक्षण परिषद, औषधनिर्माण शास्त्र परिषद, बार कौन्सिल यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थांशी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत न केल्याने  विद्यार्थ्यांना नंतरच्या काळात अधिक अडचणी येऊ शकतील, याचाही विचार राज्य सरकारने केलेला दिसत नाही. हे असे घडले याचे कारण बालहट्ट आहे, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. आदित्य ठाकरे यांचा शब्द सामंतासाठी आदेश असेलही. पण त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे अहित करण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी? अशावेळी खुद्द सामंत यांची शैक्षणिक उंची काय, विद्यापीठीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा त्यांचा अनुभव काय, हे प्रश्न निघू नयेत अशी इच्छा असली तरी ते उपस्थित होणार.

तथापि या मुद्दय़ावर ‘युवा सेना’ प्रमुखांकडून शाबासकी घेण्याच्या नादात सामंत यांनी त्यांच्या तीर्थरूपांची, म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिशाभूल केली आहे. कारण विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा रद्द करता येणार नाहीत, हे आधीच स्पष्ट केले आहे. सामंत यांनी आयोगास पत्र पाठवून परीक्षा रद्द करण्याबाबत सूचना केली होती. ती अव्हेरली गेली. सीबीएसई, आयसीएसई या परीक्षा जर करोनाकाळात घेतल्या जाऊ शकतात, तर विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात अडचण कसली? त्यातही हास्यास्पद भाग असा की परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी विद्यापीठांकडून आलेलीच नाही. ती आली विद्यार्थ्यांकडून. या मागणीला आदित्य ठाकरे यांच्या बरोबरीने पवार घराण्याच्या धाकटी पाती रोहित यांनीही पाठिंबा दिला. साहजिकच हा विषय आपोआप ‘विद्यार्थी हिताचा’ असल्याचा साक्षात्कार सरकारला झाला. यावरून शिक्षण खाते किती गांभीर्याने काम करते हे दिसते. या विद्यार्थी संघटनांनी आता गेल्या सत्रातील अनुत्तीर्णानाही पदवी देऊन टाकण्याची मागणी केली आहे. ‘युवा सेना’ देशातील सर्वच विद्यापीठांनी पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. सर्वच राज्यांत असे सामंत असले तर ती मान्यही होईल.

जगातील सगळ्या शिक्षणव्यवस्था सोप्यातून अवघडाकडे जात असताना आपण परीक्षाच रद्द करून विद्यार्थ्यांची शाबासकी मिळवणे यात एक बिनडोकपणा आहे. तो महाराष्ट्रासारख्या राज्यास मुळीच शोभत नाही. यंदा आपल्याकडे नववीपर्यंत परीक्षा नाहीत. मग दहावीच्या परीक्षेत भूगोल विषयाची परीक्षाच घेता न आल्याने अन्य विषयांत मिळवलेल्या गुणांच्या सरासरीइतके गुण देण्यास मान्यता. नंतर महाविद्याालयीन पातळीवरील पहिल्या व दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा रद्द करणे हे करोनाकाळातील शैक्षणिक वास्तव. आणि आता तर थेट शेवटच्या वर्षांची विद्यापीठांचीही परीक्षा रद्द. विद्यार्थी संघटनांच्या झुंडशाहीपुढे लोटांगण घालणारा सामंत यांचा हा दिव्य निर्णय रद्द करण्याचा शहाणपणा मुख्यमंत्री तरी दाखवतील ही आशा. महाराष्ट्राच्या शैक्षणिक दर्जासाठी ते आवश्यक आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार अशांच्या मागणीवरून इतका मोठा निर्णय घेतला जाणार असेल तर हा शिक्षणाचा ‘पोर’खेळ झाला. तोच करायचा असेल तर आणि परीक्षा रद्द करणे हाच एकमेव कार्यक्रम असेल तर महाराष्ट्रास शिक्षणमंत्री हवाच कशाला? उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांना या परीक्षा रद्दीकरणाच्या जबाबदारीतून मुक्त करावे. म्हणजे पूर्णवेळ विद्यापीठाची पदवी घेण्यासाठी तरी त्यांना वेळ मिळेल.

(लेखक गजेन्द्र राउत शिक्षा के क्षेत्र में पिछले 14 सालों से काम कर रहे हैं। ‘जिज्ञासा इंस्टीट्यूट ऑफ लर्निंग एण्ड डेवेलपमेंट’ जो महाराष्ट्र के अमरावती जिले में स्थित है, उसके संस्थापक हैं। एजुकेशन मिरर की ‘कोर टीम’ का हिस्सा हैं। आपने लंदन यूनिवर्सिटी के इंस्टीट्यूटऑफ एजुकेशन से एमए (करिकुलम, पेडागॉडी एण्ड असेसमेंट) किया है।

इस लेख पर अगर आपके सवाल और कोई विचार हैं जो टिप्पणी में जरूर लिखें। आप भी एजुकेशन मिरर के लिए अपनी स्टोरी/लेख/विचार भेज सकते हैं Whatsapp: 9076578600 पर, Email: educationmirrors@gmail.com पर।))

8 Comments on लेखः परीक्षा न घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्यच, माझे लोकसत्ताच्या अग्रलेखाला उत्तर

 1. sanjana // June 9, 2020 at 3:29 pm //

  your right and I agree with you sthiti kharch Gambhir aahe kovidchy velish shikshn mantri v shikshn sansthani vidayarthynchy jovachi parva kravi karn bre vait zale tr tychi jababdari kon ghenar sadhytri parikha n ghenycha v shala v collage band krnycha sarkarcha nirny yogyach aahe shikshn mantri v shikshn sansthani pariksha ghenychi ghai karu nye karn aajcha vidharthich udych bhavishy aahe bre vait zale tr jababdari kon ghenar

 2. Anonymous // June 8, 2020 at 5:36 pm //

  Nice

 3. shruti Marotrao Tupat // June 5, 2020 at 11:44 pm //

  “परीक्षा म्हणजे शिक्षण आणि शिक्षण म्हणजे परीक्षा अशी गफलत करायला नको” खरच एकदम बरोबर, स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. ‘माणसामधील दिव्यत्वाचे प्रकटीकरण म्हणजे धर्म व माणसामधील पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण’

  शिक्षण हे आपले ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते. यामुळे आपल्या आयुष्यात इतरांशी बोलण्याची बौद्धिक क्षमता वाढते. शिक्षण परिपक्वता आणते आणि समाजाच्या बदलत्या वातावरणात राहण्याचे शिकवते. हा सामाजिक विकास, आर्थिक विकास आणि तांत्रिक प्रगतीचा एक मार्ग आहे.

 4. Anonymous // June 5, 2020 at 10:09 am //

  शिक्षणांबाबतचा पारंपरिक द्रष्टिकोण सोडून नवीन विचारपद्धती अंमलात आणणे आवश्यक आहे. फक्त परिक्षा म्हणजे शिक्षण नव्हे तर शिक्षणाची परिसीमा त्याच्याही पेक्षा खुप व्यापक आहे. आज देशात शिक्षण सोडून बाकी बऱ्याच गोष्टी मध्ये आमूलाग्र फेरबदल झालेले दिसतात त्या प्रमाणे शिक्षणामध्येही बदल करणे आवश्यक आहे.

 5. Rajesh Karale // June 5, 2020 at 9:12 am //

  स्थिती गंभीर आहे, विद्यार्थ्यावरच जबरदस्ती का? ज्या दिवशी नेते मंडळी विधान भवनात, संसदेत बसायची हिम्मत करतील त्या दिवशी खुशाल परीक्षा घ्या.
  मानानिय राज्यपालांनी यावर फेरविचार करावा, आणि आपला हट्ट सोडावा.

 6. Anil Raut // June 5, 2020 at 8:35 am //

  सी बी एस इ आणि आय सी एस इ सारख्या संस्था तर परीक्षा घेण्याकरिता फारच उतावीळ झालेल्या आहेत. true

 7. Anonymous // June 5, 2020 at 8:24 am //

  Seems like writer lost sensitivity towards students and it’s difficult to acertain whats his point?you raised a valid point.

 8. Anonymous // June 5, 2020 at 12:26 am //

  You are right and I agree with you
  परीक्षा म्हणजे शिक्षण आणि शिक्षण म्हणजे परीक्षा अशी गफलत करायला नको

  स्थिती गंभीर आहे, विद्यार्थ्यावरच जबरदस्ती का? ज्या दिवशी नेते मंडळी विधान भवनात, संसदेत बसायची हिम्मत करतील त्या दिवशी खुशाल परीक्षा घ्या.

इस लेख के बारे में अपनी टिप्पणी लिखें

%d bloggers like this: